सोलापूर शहरातील कलावती नगर परिसरात घडलेल्या पती-पत्नीच्या आत्महत्येच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे आढळले. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या चिठ्ठीत कर्नाटकातील विजापूर येथील अभिषेक कोरे याचे नाव नमूद करण्यात आले आहे.
सुसाईड नोटमध्ये नमूद केल्याप्रमाणे, अभिषेक कोरे हा एकतर्फी प्रेमातून श्रीदेवी पाटील यांना वारंवार त्रास देत होता. बदनामी करण्याची धमकी देत मानसिक छळ केल्याचा आरोपही त्यात करण्यात आला आहे. या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आणि समाजातील बदनामीच्या भीतीने दोघांनीही टोकाचा निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत लिहिले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पत्नीला होत असलेल्या त्रासामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली असल्याचा उल्लेखही आढळला आहे.
- दरम्यान, एमआयडीसी पोलिसांनी अभिषेक कोरे याला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. सुसाईड नोटमधील आरोपांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
- या घटनेमुळे एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या मानसिक छळाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

