सोलापूर सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 (ब) मधून अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेविका वनिता संतोष पाटील यांच्या जातीच्या दाखल्याबाबत मोठी कारवाई झाली असून त्यांचा कोळी महादेव हा जातीचा दाखला रद्द व जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोकण विभागीय अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने 29 जानेवारी रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. महापालिका निवडणुकीसाठी नगरसेविका वनिता पाटील यांनी 23 डिसेंबर 2025 रोजी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तपासणीसाठी सोलापूर समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. निवडणुकीत निवडून आल्यानंतर नमुना ‘क’ मधील मूळ जमाती प्रमाणपत्रासह निवडून आल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असताना त्यांनी माहेरच्या वनिता तलवार या नावाने अर्ज केला होता.


तपासणी दरम्यान समितीच्या निदर्शनास आले की अर्जदाराचा रहिवास नागाव, तालुका उरण, जिल्हा रायगड असा दाखविण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात वनिता पाटील या मूळच्या सलगर, तालुका अक्कलकोट येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. रहिवासाबाबत चुकीची माहिती नमूद केल्याचे आढळून आल्याने पनवेल विभागाच्या समितीने दिलेला कोळी महादेव हा जातीचा दाखला रद्द व जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. तथापि, नगरसेविका पाटील यांना सर्वसाधारण रहिवाशाची योग्य माहिती नमूद करून नव्याने अर्ज करण्याची मुभा समितीकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणात तक्रारदार व माजी उपमहापौर राजेश काळे यांनी नगरसेविका वनिता पाटील यांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी सोलापूर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबाशे यांच्याकडे केली आहे. यावर आयुक्तांनी विधी विभागाचा सल्ला घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे महापालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली असून, आता आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

