अक्कलकोट | प्रतिनिधी
“जनतेचे मन जिंकून राजकारण करता येते; मात्र गुंडगिरी, धडपशाही आणि धमकावण्याच्या पद्धतीने राजकारण चालत नाही,” असा घणाघाती टोला आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी विरोधकांना लगावला. अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने चांगलीच रंगत धरली असताना, सुलेरजवळगे येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र येऊन निवडणूक लढवत असले, तरी आमदार कल्याणशेट्टी यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या सहा गटांमध्ये आणि पंचायत समितीच्या बारा गणांमध्ये त्यांची “तोफ” धडाडताना दिसत आहे.
यावेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, “तालुक्यात चार माजी आमदारांची घराणी एकत्र आली आहेत; मात्र त्यांच्या कडे विकासाचा कोणताही व्हिजन नाही. दिशाभूल करून मत मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. गेल्या सहा वर्षांत तालुक्यात झालेला विकास आणि बदल हेच आमचे भांडवल आहे. जनता सुज्ञ आहे, ती विकासालाच मत देऊन भाजपाला विजयी करेल,” असा ठाम दावा त्यांनी केला.
सुलेर जवळगे येथे आयोजित जाहीर सभेत पान मंगरूळ जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार डॉ. शिवानी स्वामी, सुलेर जवळगे पंचायत समिती गणाचे उमेदवार उत्तम वाघमारे यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली. या सभेला माजी सभापती रामचंद्र अरवत, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेविका वैशाली भोपळे,माजी उपसभापती प्रकाश हिप्परगी, परमेश्वर यादवाड, सुरेश गड्डी, शिवयोगी स्वामी, शेगावचे बाबुराव पाटील, भीमाशंकर विजापुरे, केंगावचे सरपंच बसवराज बगले ,म्हैसलगेचे सरपंच सुनील खेड, सिध्दाराम उमदी,महादेव चराटे , अजित सुतार, सुलेरजवळगेचे माजी सरपंच रामचंद्र येळेगाव,अंबादास देवकते, यांची प्रमुख उपस्थिती होती .
या जाहीर सभेस पान मंगरूळ जिल्हा परिषद गटातील विविध गावांचे सरपंच, विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे चेअरमन, प्रतिष्ठित नेते तसेच भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेतून भाजपाच्या उमेदवारांना जोरदार पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसून आले.

