अक्कलकोट: सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात ‘म्हेत्रे’ या नावाचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या पुढच्या पिढीने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत घवघवीत यश संपादन केले आहे. तब्बल ३४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर म्हेत्रे कुटुंबातील नवी पिढी ‘मिनी मंत्रालय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत दिमाखात प्रवेश करत आहे. शिवराज आणि शीतल म्हेत्रे यांचा विजय नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये म्हेत्रे परिवाराने आपली राजकीय ताकद सिद्ध केली आहे:
शिवराज म्हेत्रे: सलगर गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. शीतल म्हेत्रे: तोळणूर गणातून पंचायत समितीवर विजयी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, १९९२ साली सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आता बरोबर ३४ वर्षांनी त्यांचे पुत्र आणि कन्या त्याच सभागृहात जनसेवेसाठी सज्ज झाले आहेत.

शिवसेनेचा (शिंदे गट) बालेकिल्ला भक्कम काही महिन्यांपूर्वीच म्हेत्रे परिवाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे अक्कलकोट तालुक्यात शिवसेनेला मोठी उभारी मिळाली आहे. केवळ ७-८ महिन्यांच्या अल्प कालावधीत म्हेत्रे यांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणत शिवसेनेचा धनुष्यबाण घराघरात पोहोचवला. या विजयामुळे अक्कलकोटमध्ये आता भाजप विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. सिद्धाराम म्हेत्रे यांचा दांडगा अनुभव आणि नव्या पिढीचा उत्साह यामुळे मतदारांनी म्हेत्रे परिवाराला कौल दिला आहे.
काँग्रेस सोडल्यानंतरही म्हेत्रे यांची जनमानसातील पकड कायम असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. ”हा विजय म्हणजे जनतेने आमच्या कामावर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे. विकासाची ही परंपरा आम्ही अधिक जोमाने पुढे नेऊ.”असा निर्धार माजी मंत्री म्हेत्रे यांनी व्यक्त केला.
