अक्कलकोट: अक्कलकोट तालुक्यात (एसटी महामंडळ) यांच्या वतीने वेगवान व सुरक्षित स्मार्ट कार्ड पेमेंट तसेच एसटी स्मार्ट कार्ड यांचा शुभारंभ उत्साहात पार पडला. श्री शिवरुद्र शिवाचार्य मास्वामीजी संस्थान हिरेमठ यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाला.
या कार्यक्रमास अक्कलकोट आगार व्यवस्थापक रणजीत साळवे, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, मंगरूळचे माजी सरपंच शिवशंकर जमादार, सहाय्यक वाहतूक नियंत्रक अशोक बनसोडे, स्थानक प्रमुख श्रीमंत खसगी, वाहतूक नियंत्रक श्रीकांत कोपा, आगार लेखाकार अनिल पाटील, वरिष्ठ लिपिक श्रीकांत सडडू, अभीश्री इंटरप्राईजेसचे संतोष चव्हाण (एबिक्स कॅश प्रतिनिधी), डॉ. चंद्रकांत करजगीकर, सागर माळाबागी तसेच आयोजक बबलू जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी महास्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते एसटी स्मार्ट कार्डचे उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्य शासनाकडून महिला प्रवाशांसाठी सुरू असलेल्या विविध सवलत योजनांबाबत माहिती देण्यात आली. स्मार्ट कार्ड प्रणालीमुळे प्रवास अधिक सुरक्षित, पारदर्शक व कॅशलेस होणार असल्याचे सांगण्यात आले.

तालुक्यातील नागरिक व विशेषतः महिलांनी शासनाच्या विविध प्रवास सवलत योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले. राज्य शासनाने प्रवास सुलभ करण्यासाठी विविध धोरणे अवलंबली असून त्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. गरजू नागरिकांनी परिसरातील अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधून स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यजमान ई-सेवा केंद्राचे कर्मचारी तसेच बबलू जमादार व त्यांच्या मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतले.
