
सोलापूर | प्रतिनिधी (दि. 13 मार्च)
सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी एनटीपीसी पश्चिम विभाग-1 (WR-I) यांनी सोलापूर येथील एन. एम. वाडिया रुग्णालयातील आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी महत्त्वाचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत रुग्णालयातील ब्लॉक A, B आणि ओपीडी परिसरातील इमारतींचे नूतनीकरण व सुधारणा करण्यात येणार आहेत.

या प्रकल्पासाठी सुमारे 7.64 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, रुग्णालयातील महत्त्वाच्या आरोग्य पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून सोलापूर तसेच परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत.
या प्रकल्पासाठी 29 जून 2024 रोजी एनटीपीसी पश्चिम विभाग-1 मुख्यालय आणि एन. एम. वाडिया रुग्णालय यांच्यात सामंजस्य करार (MoA) करण्यात आला होता. या करारानुसार रुग्णालयात आवश्यक ते बांधकाम, दुरुस्ती, स्टेअर लिफ्टची स्थापना तसेच इतर वैद्यकीय पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णालयातील सेवा अधिक सुलभ आणि प्रभावी होणार आहेत.

एनटीपीसी पश्चिम विभागाचे प्रादेशिक कार्यकारी संचालक बी. जे. सेन यांनी सांगितले की, एनटीपीसीचे CSR उपक्रम समाजकल्याणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. “एन. एम. वाडिया रुग्णालयातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा झाल्याने सोलापूर व आसपासच्या भागातील नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्यसेवा मिळेल,” असे त्यांनी नमूद केले.
तसेच एनटीपीसी सोलापूर प्रकल्प प्रमुख बी. जे. सेन यांनी सांगितले की, हा उपक्रम एनटीपीसीच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांचे उन्नतीकरण केल्याने रुग्णांना अधिक चांगल्या उपचार सेवा उपलब्ध होतील आणि आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढेल.
दरम्यान, या उपक्रमामुळे सोलापूर आणि आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिकांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होणार असून, रुग्णालयातील उपचार प्रक्रिया अधिक जलद व कार्यक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.