अक्कलकोट पंचायत समितीवर भाजपचा भगवा! रश्मी हिप्परगी सभापती,तर सागर कल्याणशेट्टी यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड

अक्कलकोट:
अक्कलकोट पंचायत समितीच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाने आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. गुरुवारी झालेल्या विशेष निवडीत सभापतीपदी रश्मी हिप्परगी आणि उपसभापतीपदी सागर कल्याणशेट्टी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून तालुक्यावर भाजपची पकड अधिक घट्ट झाली आहे.

नुकत्याच झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत एकूण १२ जागांपैकी ८ जागांवर भाजप आणि ४ जागांवर शिंदे गटाच्या शिवसेनेने विजय मिळवला होता. विरोधकांचे संख्याबळ नसल्याने ही निवड केवळ औपचारिकता उरली होती.
बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब
निवडणूक प्रक्रियेपूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भाजप कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत सर्व सदस्यांशी चर्चा करून सभापतीपदासाठी रश्मी हिप्परगी आणि उपसभापतीपदासाठी सागर कल्याणशेट्टी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिकारी सुमित शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली निवडीची अधिकृत प्रक्रिया पार पडली.
सभापतीपद: रश्मी हिप्परगी यांचा एकमेव अर्ज दाखल.
उपसभापतीपद: सागर कल्याणशेट्टी यांचाही एकमेव अर्ज प्राप्त झाला.दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.