सोलापूर: | प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरूळ जिल्हा परिषद गट व गण तसेच सुलेरजवळगे पंचायत समिती गणाच्या निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या गटावर आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी पाटील कुटुंबातील चारही बंधूंनी शड्ड ठोकून मैदानात उतरून दिवस-रात्र प्रचारात झोकून दिले आहे.
यंदा पान मंगरूळ जिल्हा परिषद गट इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला राखीव झाल्याने पाटील परिवारातील थेट उमेदवार रिंगणात नसला, तरीही ऐन निवडणुकीत भाजपाला सोडचिट्टी देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करून पाटील बंधूंनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राष्ट्रवादीकडून पान मंगरूळ जिल्हा परिषद गटासाठी सुज्ञानी बनसोडे, सुलेरजवळगे पंचायत समिती गणासाठी प्रल्हाद वाघमारे तर पान मंगरूळ पंचायत समिती गणासाठी , भुवनेश्वरी कोरशेट्टी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वर्गीय माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या निधनानंतर प्रथमच ही निवडणूक होत असल्याने पाटील कुटुंबियांसाठी ही लढत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे

पूर्वी याच पान मंगरूळ जिल्हा परिषद गटातून शिवानंद पाटील निवडून येत त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष पद भूषवले होते. त्यामुळे हा गट स्वर्गीय माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. तो पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी माजी अध्यक्ष शिवानंद पाटील, माजी सभापती संजीव पाटील, रमेश पाटील आणि दिलीप पाटील हे चारही बंधू एकत्रितपणे प्रचारात उतरले असून मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दरम्यान, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असून तगडे उमेदवार मैदानात उतरवून मोठे आव्हान उभे केले आहे. भाजपकडून पान मंगरूळ जिल्हा परिषद गटासाठी डॉक्टर . शिवानी स्वामी, सुलेरजवळगे गणासाठी उत्तम वाघमारे आणि पान मंगरूळ पंचायत समिती गणासाठी डॉक्टर. रश्मी हिप्परगी हे उमेदवार रिंगणात आहेत.
अक्कलकोट तालुक्यात भाजप स्वतंत्र लढत देत असताना दुसरीकडे काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र येऊन उमेदवार उभे करत आहेत. पान मंगरूळ जिल्हा परिषद गट राष्ट्रवादीकडे सोडत काँग्रेसचे मल्लिकार्जुन पाटील आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी मोठी राजकीय खेळी खेळल्याची चर्चा आहे. माजी अध्यक्ष शिवानंद पाटील आणि स्वामी समर्थ कारखान्याचे संचालक दिलीप पाटील यांच्या सर्वपक्षीय आपलेपणा व मृदू स्वभावामुळे मतदारांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे पान मंगरूळ जिल्हा परिषद गटातील प्रचाराला चांगलीच रंगत आली असून प्रचारासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना ही निवडणूक चुरशीची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


