सोलापूर ; अक्कलकोट तालुक्यातील पान मंगरूळ जिल्हा परिषद गटातील निवडणूक प्रचाराने आता निर्णायक वळण घेतले असून, आज सोमवारी सायंकाळी ठीक सहा वाजता आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांची जाहीर सभा होत आहे. या सभेमुळे पान मंगरूळ आणि सुलेर-जवळगे परिसरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या वतीने पान मंगरूळ जिल्हा परिषद गटासाठी डॉ. शिवानी स्वामी, सुलेर-जवळगे पंचायत समिती गणासाठी उत्तम वाघमारे तर पान मंगरूळ पंचायत समिती गणासाठी डॉ. रश्मी हिप्परगी हे उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांच्या प्रचारासाठी ही जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. आमदार कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीमुळे भाजपच्या प्रचाराला नवे बळ मिळणार असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केलेल्या शिवानंद पाटील व त्यांच्या बंधूंनीही या मतदारसंघात उमेदवार उभे केल्याने निवडणूक लढत अधिकच रंगतदार झाली आहे. यामुळे पान मंगरूळ जिल्हा परिषद गटात प्रचाराची धुरळा उडाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या जाहीर सभेत आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी काय भूमिका मांडणार, विरोधकांवर कोणते शब्दबाण सोडणार आणि मतदारांना कोणता संदेश देणार, याकडे संपूर्ण पानमंगरूळ जिल्हा परिषद गटातील मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. आजची सभा निवडणुकीची दिशा ठरवणारी ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.



Nice to hear updated news from rural area .Good networking covered.