अक्कलकोट : जनतेचे मन जिंकून राजकारण करता येते; मात्र गुंडगिरी, धडपशाही आणि धमकावण्याच्या पद्धतीने राजकारण चालत नाही,” असा घणाघाती टोला आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांनी विरोधकांना लगावला. अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराने चांगलीच रंगत धरली असताना, पान मंगरूळ येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

अक्कलकोट तालुक्यात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्र येऊन निवडणूक लढवत असले, तरी आमदार कल्याणशेट्टी यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे. जिल्हा परिषदेच्या सहा गटांमध्ये आणि पंचायत समितीच्या बारा गणांमध्ये त्यांची “तोफ” धडाडताना दिसत आहे.

यावेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, “तालुक्यात चार माजी आमदारांची घराणी एकत्र आली आहेत; मात्र त्यांच्या कडे विकासाचा कोणताही व्हिजन नाही. दिशाभूल करून मत मिळवणे हाच त्यांचा उद्देश आहे. गेल्या सहा वर्षांत तालुक्यात झालेला विकास आणि बदल हेच आमचे भांडवल आहे. जनता सुज्ञ आहे, ती विकासालाच मत देऊन भाजपाला विजयी करेल,” असा ठाम दावा त्यांनी केला.
पान मंगरूळ येथील महादेव मंदिराच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभेत पान मंगरूळ जिल्हा परिषद गटातील भाजपाच्या उमेदवार डॉ. शिवानी स्वामी, पान मंगरूळ पंचायत समिती गणातील उमेदवार डॉ. रश्मी हिप्परगी व उत्तम वाघमारे यांच्या प्रचारार्थ ही सभा पार पडली. यावेळी परमेश्वर यादवाड, अजित सुतार, आनंद बुक्कानुरे, अंबादास देवकते यांनी तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
सभेला माजी सभापती रामचंद्र अरवत, डॉ. अशोक हिप्परगी, माजी उपसभापती प्रकाश हिप्परगी, मैंदर्गी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष सुरेश नागूर, सुरेश गड्डी, शिवयोगी स्वामी, शिवसिद्ध बुळ्ळा, दयानंद उंबरजे, सुनील खेड, अंबादास देवकते, राजकुमार पाटील, तडवळचे सरपंच संतोष कुंभार, महादेव चराटे, शिवलिंगप्पा अरवत, पान मंगरूळचे माजी सरपंच शिवशंकर जमादार, अकबर मुजावर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

