सोलपूर ; अक्कलकोट येथील गटशिक्षणाधिकाऱ्यावर कारवाई करावी या मागणीसाठी मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदच्या प्रवेशद्वारासमोर उपोषण सुरू करण्यात आले आहे. अक्कलकोट तालुका पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबळे यांनी सप्टेंबर 2024 मध्ये विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून काही शिक्षकांची प्रतिनियुक्ती (प्रतिनिधी) केली होती. या प्रतिनियुक्तीबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित शिक्षकांनी मागासवर्गीय शिक्षक संघटनेकडे तक्रार दाखल केली होती.
तक्रारीची दखल घेत संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती गठीत केली. समितीमार्फत चौकशी पूर्ण होऊन अहवाल सादर होऊन एक वर्षाचा कालावधी उलटूनही गटशिक्षण अधिकारी प्रशांत अरबळे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा संघटनेचा आरोप आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना महांतेश्वर कट्टीमनी यांनी सांगितले की, चौकशी अहवालानंतरही कारवाई न होणे ही गंभीर बाब असून, दोषींवर त्वरित प्रशासकीय कारवाई व्हावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल



