सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या जिल्हाध्यक्षपदी दयानंद परिचारक; महिला जिल्हाध्यक्षपदी मृणालिनी शिंदे

सोलापूर | प्रतिनिधी
जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा शाखा सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदी कनिष्ठ प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. तसेच महिला जिल्हाध्यक्षपदी विस्तार अधिकारी (सां) मृणालिनी शिंदे यांची निवड जाहीर करण्यात आली.
ही निवड महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांच्या अध्यक्षतेखाली विसावा सभागृह येथे झालेल्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली.
इतर पदाधिकाऱ्यांची निवड
जिल्हा उपाध्यक्ष: विशाल घोगरे (कनिष्ठ सहायक)
कार्याध्यक्ष: शिवाजी राठोड (कनिष्ठ सहायक)
महिला उपाध्यक्ष: श्रीमती सविता काळे (परिचर)
महिला कार्याध्यक्ष: स्वाती स्वामी (विस्तार अधिकारी – शिक्षण)
निवडीनंतर पुणे विभागीय संघटक डॉ. एस. पी. माने यांनी मान्यता देत नव्या पदाधिकाऱ्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. उर्वरित जिल्हा व तालुका कार्यकारिणीची निवड अध्यक्ष व सचिव यांच्या नेतृत्वाखाली लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
स्वर्गीय विवेक लिंगराज यांना श्रद्धांजली
बैठकीपूर्वी स्वर्गीय विवेक लिंगराज (सहायक प्रशासन अधिकारी) यांच्या छायाचित्रास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचा आदर्श ठेवून संघटनेचे काम पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
“कर्मचाऱ्यांचे हक्क आणि आत्मसन्मान अबाधित ठेवू”
नवीन जिल्हाध्यक्ष दयानंद परिचारक यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की,
“निःपक्ष, निःस्वार्थ आणि निर्भीडपणे सर्व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू. कर्मचाऱ्यांचे हक्क आणि आत्मसन्मान जपण्यासाठी संघटना कटिबद्ध राहील. अन्याय झाल्यास प्रशासनाशी ठाम भूमिका घेऊ.”
बैठकीस पतसंस्था क्र. १ चे व्हाईस चेअरमन श्रीधर कलशेट्टी, माजी जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवल्ली, तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी, महिला प्रतिनिधी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूर जिल्ह्यातील कर्मचारी वर्गासाठी ही निवड नव्या नेतृत्वाची नांदी मानली जात असून, येत्या काळात कर्मचारी प्रश्नांवर संघटनेची भूमिका अधिक ठाम आणि सक्रिय राहणार असल्याचे संकेत या बैठकीतून देण्यात आले.