“अंगणवाडी सेविका बालकांच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया” – सीईओ कुलदीप जंग
जिल्हा परिषदेकडून 112 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ‘आदर्श कर्मचारी’ पुरस्काराने गौरव

सोलापूर | प्रतिनिधी
“अंगणवाडी सेविका आणि मदतनिस या बालकांच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया आहेत. बालकांचे पोषण, आरोग्य आणि पूर्वप्राथमिक शिक्षणाबरोबरच गर्भवती व स्तनदा मातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्या प्रामाणिकपणे करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे शासनाच्या विविध योजना तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहेत,” असे प्रतिपादन जिल्हा परिषद सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.

महिला व बालविकास विभाग, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने जामगुंडी मंगल कार्यालय येथे सन 2025 मधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ‘आदर्श कर्मचारी’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्ह्यातील 16 ग्रामीण प्रकल्पांमधील एकूण 112 अंगणवाडी कर्मचारी या पुरस्काराचे मानकरी ठरले. यामध्ये 16 अंगणवाडी पर्यवेक्षिका, 48 अंगणवाडी सेविका आणि 48 मदतनिस यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सीईओ कुलदीप जंगम उपस्थित होते. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी (सांख्यिकी), अंगणवाडी पर्यवेक्षिका तसेच अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, सध्या अंगणवाडी सेविकांमार्फत लेक लाडकी योजना, एकल महिला सर्वेक्षण, प्रधानमंत्री मातृवंदन योजना तसेच आदिशक्ती योजना यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका अत्यंत जबाबदारीने व प्रामाणिकपणे या योजनांचे काम करत आहेत, ही अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमानिमित्त आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा विशेष संदेश देण्यात आला. महिलांचे सशक्तीकरण, समाजातील त्यांचे योगदान आणि नेतृत्वाचे महत्त्व अधोरेखित करत “स्त्री ही शक्ती, प्रेरणा आणि परिवर्तनाची मूर्ती आहे,” असा संदेश देण्यात आला.
या प्रसंगी पुरस्कार प्राप्त अंगणवाडी कर्मचारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रताप रुपनर, शिवानंद मगे, साहेबराव देशमुख, रेणुका प्रथमशेट्टी, पांचाळ, अमिता वसेकर आणि निर्मला कोरे यांनी परिश्रम घेतले.