सिईओ कुलदीप जंगम यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांचे हस्ते सेवाकर्मी पुरस्कार देऊन सन्मान

सोलापूर, दि. २८ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या सेवाकर्मी कार्यक्रमात सोलापूर जिल्हा परिषदेनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरीची नोंद केली आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा “उत्कृष्ट कार्यालय प्रमुख” म्हणून सन्मान करण्यात आला.
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या राज्यस्तरीय समारंभात सोलापूर जिल्हा परिषदेला प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार , राज्याचे मुख्य सचिव राजेश आग्रवाल प्रमुख उपस्थित होते.
१०० पैकी तब्बल ८० गुण मिळवत राज्यात अव्वल स्थान मिळवण्याचा मान सोलापूरने पटकावला.
गुणांकनात सर्वच निकषांवर दमदार कामगिरी
सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत विविध प्रशासकीय निकषांवर सोलापूर जिल्हा परिषदेनं उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
ज्येष्ठता सूची – सर्व संवर्गांची अद्ययावत यादी (१०/१०)
पदोन्नती प्रक्रिया – रिक्त पदांचे प्रमाण कमी ठेवत प्रभावी अंमलबजावणी (१०/१०)
सरळसेवा भरती – मोठ्या प्रमाणावर पदे भरून कार्यक्षमता वाढवली (१०/१०)
बिंदुनामावली प्रमाणीकरण – ९४% पेक्षा अधिक पूर्णता (१०/१०)
अनुकंपा नियुक्ती – सर्व पदे पूर्ण (१०/१०)
iGOT प्रशिक्षण – ९५% कर्मचाऱ्यांनी कोर्स पूर्ण (१०/१०)
सेवापुस्तक अद्ययावत – ९९% नोंदी अद्ययावत (२०/२०)
या बद्दल पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते , महिला व बालकल्याण समितीचे सभापती अॅड. अमृता वाघे, अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी अभिनंदन केले आहे.
गेल्या दीड वर्षांच्या काळात आषाढी यात्रा – निर्मल वारी उपक्रम यशस्वीरित्या राबविला आहे. गतीमान प्रशासना बरोबर डीजीटल सुधारणा, कामाचा निपटारा, पुरस्थिती, आषाढी यात्रा कालावधीत केलेले कामामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामाची राज्यस्तरावर दखल घेणेत आली आहे.
राज्यासाठी आदर्श ठरलेले मॉडेल
ग्रामविकास विभागांतर्गत राबविण्यात आलेल्या या कार्यक्रमात कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेचा सर्वंकष आढावा घेतला गेला. त्यात सोलापूर जिल्हा परिषदेनं केवळ लक्ष्य पूर्ण केलं नाही, तर इतर जिल्ह्यांसाठी आदर्श मॉडेल उभं केलं.
“ही टीमवर्कचीच फलश्रुती” – कुलदीप जंगम
“सेवाकर्मी कार्यक्रमातील पारदर्शकता, शिस्तबद्धता आणि प्रशिक्षणावर दिलेला भर यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेनं प्रशासनाचा ठसा उमटवला. हा पुरस्कार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सांघिक कामाचं यश आहे. पुढेही अधिक जबाबदारीनं काम करू.”–सीईओ कुलदीप जंगम
सोलापूरच्या यशाची राज्यभर दखल
या कामगिरीमुळे सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाच्या कार्यक्षमतेचं नवं उदाहरण ठरलं असून, राज्यभरातून या यशाची दखल घेतली जात आहे. शासनाच्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी कशी करावी, याचा आदर्श सोलापूरने घालून दिला आहे.