जि.प. शाळांचा दर्जा उंचावणार; विद्यार्थी पट वाढविण्यास प्राधान्य — चेतनसिंह केदार सावं

सोलापूर, दि. २ —
सोलापूर जिल्हा परिषद शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थी पट वाढविणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असून त्यासाठी शिक्षण विभागाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत, अशी माहिती जि.प. शिक्षण व आरोग्य समितीचे नूतन सभापती चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
गुरुवारी पदभार स्वीकारल्यानंतर विविध संस्था व संघटनांच्या वतीने सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या प्राधान्यक्रमांची रूपरेषा स्पष्ट केली.
सावंत म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांचा नावलौकिक वाढविल्याशिवाय विद्यार्थ्यांचा ओढा निर्माण होणार नाही. त्यामुळे लवकरच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शाळांच्या दर्जात्मक सुधारणांसाठी ठोस कृती आराखडा तयार केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करणारे वातावरण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि मूलभूत सुविधांची पूर्तता यावर विशेष भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“इतर जिल्ह्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श घ्यावा, असे काम आपल्या शाळांमधून झाले पाहिजे,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि पालकांचा विश्वास वाढविणे या तीन प्रमुख बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पदभार स्वीकारण्यापूर्वी सावंत यांनी वाढेगाव येथील प्राथमिक शाळा व आरोग्य उपकेंद्र तसेच आंधळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी सुविधा समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांची उपस्थिती होती.