पवित्र पोर्टलवरील ‘पसंतीक्रम’ अट रद्द करण्याची शिक्षक संघटनांची जोरदार मागणी.

मुंबई/सोलापूर, दि. ४ –
शिक्षक भरतीसाठीच्या पवित्र पोर्टलवरील पसंतीक्रम मर्यादेच्या नव्या अटींवरून राज्यभरात नाराजीचा सूर उमटू लागला आहे. २ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारांतील सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होणार असले तरी, त्यापैकी लॉक करता येणाऱ्या पसंतीक्रमांवर मर्यादा घालण्यात आली आहे.
नवीन तरतुदीनुसार, मुलाखतीशिवायच्या निवडीसाठी उमेदवारांना जास्तीत जास्त १०० पसंतीक्रम लॉक करता येणार आहेत, तर मुलाखतीसहच्या प्रकारासाठी ही मर्यादा ५० इतकी ठेवण्यात आली आहे. मात्र, ही अट अन्यायकारक व जाचक असल्याचा आरोप विविध शिक्षक संघटनांनी केला आहे.
राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगुर यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत, “१०० पसंतीक्रमांची अट तात्काळ रद्द करून पूर्वीप्रमाणे अमर्याद पसंतीक्रमाची सुविधा लागू करावी. अन्यथा कमी व मध्यम मेरिटधारक उमेदवारांचे मोठे नुकसान होईल,” असे स्पष्ट केले. त्यांच्या मते, अनेक ठिकाणी १०० जागांमधून केवळ १० उमेदवारांचीच मुलाखतीद्वारे निवड होत असल्याने उर्वरित उमेदवारांसाठी संधी मर्यादित होत आहे.
युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटनेचे अध्यक्ष संदीप कांबळे यांनीही याबाबत भूमिका मांडताना, “किमान उपलब्ध जागांच्या ९० टक्के पदांपर्यंत पसंतीक्रम लॉक करण्याची मुभा देण्यात यावी. तसेच २०२६ मधील रिक्त पदेही या भरती प्रक्रियेत समाविष्ट करावीत,” अशी मागणी केली.
दरम्यान, १२ ते १७ मार्चदरम्यान मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले. या चर्चेत गुणवत्तेला ५० टक्के न्याय मिळाल्याचा दावा करण्यात आला असला, तरी अंतिम निर्णयात गुणवत्ता डावलली जाऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
एकूणच, पवित्र पोर्टलवरील पसंतीक्रम मर्यादेच्या मुद्द्यावरून राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, सरकारने यावर लवकरात लवकर पुनर्विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.