समाज कल्याणच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणार – सभापती संस्कृती सातपुते यांची ग्वाही
सोलापूर, प्रतिनिधी :
जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संस्कृती सातपुते यांनी कामकाजाला जोमाने सुरुवात करत समाजातील वंचित घटकांपर्यंत योजना पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
सोमवारी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर सातपुते यांनी अधिकृतपणे आपल्या कामकाजाचा श्रीगणेशा केला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सभापतींची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
पत्रकारांशी संवाद साधताना सातपुते म्हणाल्या की, “समाज कल्याण विभाग हा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रभावी दुवा आहे. मिळालेल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देत प्रत्येक योजना वंचित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे.”
समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबवण्यात येणार असून, रिक्त पदे भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यासोबतच मुलींची वसतिगृहे आणि दिव्यांग शाळांमधील सुविधा, सुरक्षा आणि गुणवत्ता यावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी आमदार राम सातपुते यांच्या सामाजिक कार्याचा आदर्श समोर ठेवूनच आपण राजकीय प्रवास सुरू ठेवला असून, मिळालेल्या जबाबदारीला पूर्ण न्याय देण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
एकूणच, समाज कल्याणाच्या योजनांना गती देत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने सातपुते यांनी ठोस पावले उचलण्याचा निर्धार केला आहे.