सोलापूर जिल्ह्यात आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणार — सभापती चेतनसिंह केदार सावंत
स्वच्छता मोहीम, ‘आभा’ कार्डला गती, नवीन आरोग्य केंद्रांची उभारणीवर भर

सोलापूर (प्रतिनिधी):
सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य समितीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीसाठी विविध उपाययोजनांना हिरवा कंदील देण्यात आला.
केंद्र सरकारच्या ‘आभा’ (ABHA) कार्ड योजनेला गती देण्यासाठी आशा सेविका, आरोग्य कर्मचारी आणि संबंधित विभागांमध्ये समन्वय वाढवण्याचे निर्देश देण्यात आले. वाढती लोकसंख्या व भौगोलिक गरजा लक्षात घेता जिल्ह्यात नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला.

बैठकीत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी २०२५-२६ या वर्षातील आरोग्य योजनांचा आढावा सादर केला. ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर निर्जंतुक ठेवण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच आशा स्वयंसेविकांना प्रशिक्षण देऊन त्यांना वैद्यकीय किटचे वाटप करण्यात येणार असून, किरकोळ आजारांवर गावपातळीवरच उपचार उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. औषध पुरवठ्यासाठी सेस फंडातून निधी उपलब्ध करून देण्याचेही ठरविण्यात आले.
आरोग्य विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासोबतच राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत कंत्राटी भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले. रुग्णांशी सौजन्यपूर्ण व तत्परतेने वागून दर्जेदार सेवा देण्यावरही विशेष भर देण्यात आला.
सरकारी रुग्णालयांवरील विश्वास वाढवण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे सभापती सावंत यांनी स्पष्ट केले.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.