राज्यस्तरीय ‘महालक्ष्मी सरस’मध्ये सोलापूरचा दबदबा; ९१ लाखांच्या विक्रीसह राज्यात अव्वल.

सोलापूर प्रतिनिधी : महालक्ष्मी सरस प्रदर्शन २०२५-२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याने यंदा अभूतपूर्व यशाची नोंद केली आहे. सिडको एक्जीबिशन सेंटर वाशी येथे २३ मार्च ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान पार पडलेल्या या राज्यस्तरीय प्रदर्शनात सोलापूरच्या केवळ १४ स्वयंसहायता समूहांनी तब्बल ९१.१९ लाख रुपयांची विक्री करत संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या यशाची माहिती देताना सांगितले की, “ग्रामीण महिलांच्या कौशल्याला मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा उद्देश होता आणि सोलापूरच्या महिलांनी ९१ लाखांच्या विक्रीतून आपले सामर्थ्य सिद्ध केले आहे.”
‘उमेद’चा दमदार ठसा
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आयोजित या प्रदर्शनासाठी सोलापूर जिल्ह्याचे नियोजन प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे व राहुल जाधव यांच्या समन्वयातून संपूर्ण व्यवस्थापन पार पडले.
मुंबईकरांना भुरळ घालणारे ‘सोलापुरी स्वाद’
प्रदर्शनात सोलापूरच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. विशेषतः पुढील उत्पादनांनी मोठी विक्री केली—
खाद्यपदार्थ: कडक भाकरी, शेंगा चटणी, काळा मसाला, सांडगे, दही मिरची
आरोग्यदायी उत्पादने: सेंद्रिय ज्वारी, कडधान्ये, गूळ, मिलेट पापड
फळे व मिष्टान्न: डाळिंब, पेरू, पेडा, सीताफळ रबडी, मटका कुल्फी
इतर: बांबू ब्रश, आवळा उत्पादने, नॉन-व्हेज राईस प्लेट व बिर्याणी
विक्रीत आघाडीवर असलेले गट
विठ्ठल-रुक्मिणी समूह, पंढरपूर – ₹9,29,180
श्री शारदा समूह, पंढरपूर – ₹8,63,550
तनीष्का समूह, सोलापूर दक्षिण – ₹8,26,870
जिजाऊ समूह, बार्शी – ₹7,77,800
उत्कर्ष समूह, अक्कलकोट – ₹7,64,000
(एकूण उलाढाल : ₹91,19,000)
महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श
प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच सोलापूरने आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम राखली. केवळ १४ गटांनी ९१ लाखांचा टप्पा पार करणे ही राज्यासाठी एक प्रेरणादायी कामगिरी ठरली आहे. यामुळे ‘उमेद’ अंतर्गत कार्यरत हजारो महिलांना मोठा आत्मविश्वास मिळाला आहे. मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
या यशाबद्दल जयकुमार गोरे, निलेश सागर, निखिलकुमार ओसवाल, दीपक वैद्य, इंद्रजीत पवार, चेतनसिंह केदार सावंत, अमृता वाघे, रामप्पा चिवडशेट्टी आणि संस्कृती सातपुते यांनी ‘उमेद’ टीमचे अभिनंदन केले.