सोलापूरात ९ ते १४ एप्रिल दरम्यान ‘समता सप्ताह’
संविधान मूल्यांची जनजागृती; १ हजारांहून अधिक उद्देशिकांचे वितरण.

सोलापूर प्रतिनिधी :
सामाजिक समता, बंधुता आणि संविधानातील मूल्यांची जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने ९ ते १४ एप्रिल या कालावधीत ‘समता सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्ताहादरम्यान जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये विशेष जनजागृती कार्यक्रम राबवले जाणार आहेत. यात संविधान उद्देशिकेचे वाचन, व्याख्याने, चर्चासत्रे तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत १ हजारांहून अधिक संविधान उद्देशिकांचे वितरण करण्यात येणार असून, नागरिकांना संविधानातील मूलभूत मूल्यांची ओळख करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी यासाठी मार्गदर्शन सत्रांचेही आयोजन केले जाणार आहे.
समता सप्ताहाच्या निमित्ताने महापुरुषांच्या विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करण्यात येणार असून, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. हा उपक्रम केवळ औपचारिक नसून समाजात एकात्मता, समानता आणि सामाजिक न्याय यांची जाणीव अधिक दृढ करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे, असे सातपुते यांनी सांगितले.
तसेच समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यामध्ये दिव्यांग कल्याण, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन, दलित वस्ती सुधारणा यांसारख्या योजनांचा समावेश आहे.
समता सप्ताहाच्या माध्यमातून समाजात एकात्मता आणि समानतेचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.