रुद्देवाडी जवळ भीषण अपघात; एसटी बस–डंपरची जोरदार धडक, २ ठार – अनेक जखमी
सोलापूर (प्रतिनिधी) :
अक्कलकोट गाणगापूर महामार्गावर रुद्देवाडी बसस्थानकाजवळ सोमवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास एसटी बस आणि मुरूमाने भरलेल्या डंपरमध्ये भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकोटहून गाणगापूरकडे जाणारी एसटी बस रुद्देवाडी परिसरातून जात असताना समोरून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की एसटी बसचे मोठे नुकसान झाले.
अपघातानंतर डंपर पुढे जाऊन उलटला आणि त्याने अचानक पेट घेतल्याने परिस्थिती अधिकच भीषण बनली.
काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला. बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच दुधनी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
स्थानिक ग्रामस्थांनीही तत्काळ मदतीसाठी पुढे येत जखमींना बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यास मदत केली.
दरम्यान, पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल होताच बचावकार्य वेगाने सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.