दुःखद! कवी माधव पवार यांचे निधन; मराठी साहित्यविश्वावर शोककळा.

सोलापूर : मराठी साहित्यविश्वातील संवेदनशील आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले कवी माधव रा. पवार यांचे बुधवारी (दि. ६ मे) पहाटे ४ वाजता राहत्या निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मराठी साहित्य पटलावरील एक तेजस्वी तारा निखळल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ७२ वर्षे होते.
त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सायंकाळी ४ वाजता मोदीखाना येथील निर्मिती टॉवर्समधील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार असून, त्यांच्यावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कवी माधव पवार हे केवळ कवी म्हणूनच नव्हे, तर उत्तम वक्ते, नकलाकार आणि प्रभावी सूत्रसंचालक म्हणूनही संपूर्ण महाराष्ट्रात परिचित होते. सुप्रसिद्ध कवी रा. ना. पवार यांचे सुपुत्र म्हणून ओळख असली, तरी त्यांनी स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर साहित्य क्षेत्रात स्वतंत्र स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या ‘हे शुभ शकुनाचे पक्षी’ या काव्यसंग्रहाला राज्यातील तब्बल ११ प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त झाले होते. तसेच ‘गरुडभरारी’ हा त्यांचा आणखी एक गाजलेला काव्यसंग्रह आहे. त्यांच्या साहित्यकृतींना आणि योगदानाला अनेक मान्यवर पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
त्यांच्या रचनांची दखल संगीतविश्वानेही घेतली होती. पार्श्वगायक प्रल्हाद शिंदे, त्यांचे सुपुत्र आनंद शिंदे तसेच नातू आदर्श शिंदे या तिन्ही पिढ्यांनी त्यांच्या गीतांना स्वर दिले होते.
साहित्य क्षेत्रातील दिग्गजांशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, कविवर्य फ. मुं. शिंदे आणि गझलसम्राट सुरेश भट यांच्यासोबत त्यांचा स्नेह होता.
गेल्या काही काळापासून त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला होता. दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याने त्यांच्यावर तब्बल १६०० वेळा डायलिसिस करण्यात आले होते. तरीही त्यांनी आयुष्यभर साहित्यसेवा अखंडपणे सुरू ठेवली.
कवी माधव पवार यांच्या निधनाने सोलापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य, सांस्कृतिक आणि कलाक्षेत्रावर शोककळा पसरली असून, त्यांच्या आठवणींना शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याची भावना व्यक्त होत आहे.