पात्रता नसताना टीका; ‘प्रसिद्धीचा स्टंट’ – आमदार कोठे यांचा प्रणिती शिंदेंवर हल्लाबोल.

सोलापूर : प्रतिनिधी
नसरापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असताना आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “पात्रता नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” अशी खरमरीत टीका त्यांनी केली.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. कोठे म्हणाले की, नसरापूर येथील घटनेतील पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. “देशात कायद्याच्या चौकटीत राहून आरोपींना त्वरित शिक्षा मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा वेळी केवळ प्रसिद्धीसाठी टीका करणे योग्य नाही,” असे त्यांनी नमूद केले.
तसेच, “कॅमेरे आणि माईक दिसताच प्रतिक्रिया देण्याची घाई ही केवळ टीआरपीसाठी आहे,” असा टोला लगावत कोठे यांनी शिंदे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
वडिलांच्या काळातील घटनांवरही सवाल
आ. कोठे यांनी पुढे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यकाळाचा संदर्भ देत विचारले, “त्या काळातही देशात अनेक गंभीर घटना घडल्या. तेव्हा आमदार असलेल्या प्रणिती शिंदे यांनी आपल्या वडिलांकडे राजीनाम्याची मागणी केली होती का?”
‘विकासाऐवजी श्रेय घेण्याचे राजकारण’
“जनतेने खासदार म्हणून काम करण्याची जबाबदारी दिली असताना विकासावर लक्ष न देता श्रेय घेण्याचे राजकारण सुरू आहे,” असा आरोप करत कोठे म्हणाले की, “सरकारकडून मंजूर झालेल्या योजनांचे पत्र वाटप, नेत्यांसोबत फोटो काढणे आणि कामाचे श्रेय स्वतःकडे घेणे ही चुकीची पद्धत आहे.”
: ‘आंदोलनापासून दूर का?’
नसरापूर प्रकरणावर विविध संघटनांनी आंदोलन केले असताना, “खऱ्या सहानुभूतीपोटी सहभागी व्हायला हवे होते. मात्र जाणीवपूर्वक टाळले,” असा आरोप करत कोठे यांनी त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला.
: ‘सुसंस्कृत राजकारणाचा वारसा जपा’
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात सुशीलकुमार शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याची आठवण करून देत कोठे म्हणाले, “घरात सुसंस्कृत राजकारणाचा वारसा असताना खालच्या पातळीवरील टीका करणे योग्य नाही. त्या वारशाला साजेशी भूमिका घ्यावी.”
एकूणच, नसरापूर प्रकरणाच्या निमित्ताने सोलापूर जिल्ह्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, कोठे-शिंदे वादामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.