जिल्हा परिषद सोलापूरमध्ये विकासाचा नवा वेग
स्थायी समिती सभेत ग्रामीण आरोग्य, विकासकामांची गुणवत्ता आणि पारदर्शकतेवर सखोल चर्चा; लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा समन्वय दिसला

सोलापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद सोलापूरच्या शिवरत्न सभागृहात स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. जिल्हा परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय साधत विकासकामांना गती देण्याच्या दृष्टीने ही सभा महत्त्वपूर्ण ठरली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती दीपक वैद्य होते.
सभेस उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार सावंत, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती रामपा चिवडशेट्टी, तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, शांभवी कल्याणशेट्टी, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे, दादासाहेब लवटे, सविता उंबरजे आणि रमेश भांजे यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली.
प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तथा सदस्य सचिव स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी सदस्य सचिव स्मिता पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून बैठकीस प्रारंभ केला. त्यानंतर विविध विभाग प्रमुखांनी शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण परिपत्रके व शासन निर्णयांचे वाचन करून त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत माहिती दिली.
सभेत विशेषतः ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवर सखोल चर्चा करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांतील सेवा अधिक सक्षम करणे, औषधसाठा उपलब्धता, आवश्यक मनुष्यबळाची पूर्तता आणि ग्रामीण नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर गांभीर्याने विचारमंथन झाले.
तसेच जिल्ह्यातील विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता, गती आणि पारदर्शकता राखण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. विकासकामांमध्ये शिस्त, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी यावर सभेत विशेष भर देण्यात आला.
जिल्हा परिषद सोलापूर विकासकामांना अधिक गती देत असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक पावले उचलली जात असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.