टाकळीतील सिमेंट रस्त्यात मोठा घोटाळा?; ४० एमएम ऐवजी २० एमएम खडी वापरल्याचा आरोप
५% कालदोष बिल वेळेआधीच अदा; संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी, अन्यथा बेमुदत उपोषणाचा इशार

सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी येथे करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेने केला असून, या प्रकरणाची तिसऱ्या पक्षामार्फत चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांना निवेदन सादर करण्यात आले.
संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश कांबळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, टाकळी येथे शिवप्पा कोळी घर ते बी.एस. कॅम्प या मार्गावर सुमारे ५ लाख रुपयांचा सिमेंट काँक्रीट रस्ता मंजूर करण्यात आला होता. मात्र काम करताना शासनाच्या इस्टिमेटनुसार पहिल्या लेअरसाठी ४० एम.एम. खडी वापरणे आवश्यक असताना संबंधित ठेकेदाराने २० एम.एम. खडी वापरून काम पूर्ण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यामुळे रस्त्याचा दर्जा खालावला असून, अनेक रस्ते कामे अशाच पद्धतीने निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या आतच रस्ते खराब होत असल्याने शासनाच्या निधीची उधळपट्टी होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, संबंधित कामाचे बिल ऑगस्ट २०२५ मध्ये मंजूर झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले काम पूर्ण झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर
डिसेंबर २०२५ मध्ये ५ टक्के कालदोष बिल अदा करण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. शासन नियमानुसार हे बिल काम पूर्ण झाल्यानंतर एक वर्षानंतर देणे अपेक्षित असताना ते कोणत्या आधारावर मंजूर करण्यात आले, असा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे.
तसेच या कामाचे एम.बी. (मोजमाप पुस्तिका) लिहिणारे अधिकारी व ५% बिल मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच निकृष्ट दर्जाचे झालेले रस्त्याचे काम पुन्हा इस्टिमेटप्रमाणे करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास जिल्हा परिषद पूनम गेटसमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.