विधान परिषद निवडणुकीसाठी आचारसंहितेची कडक अंमलबजावण
सर्व राजकीय पक्ष व शासकीय यंत्रणांनी नियमांचे काटेकोर पालन करावे : जिल्हाधिकारी एस. कार्तिकेय
१८ जूनला मतदान, २२ जूनला मतमोजणी; सोलापूर जिल्ह्यात निवडणूक तयारीला

सोलापूर प्रतिनिधी :
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून १८ मेपासून सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणेच ही आचारसंहिता प्रभावी राहणार असल्याने सर्व राजकीय पक्ष तसेच शासकीय यंत्रणांनी तिचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधी व शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सांगितले की, २५ मे २०२६ रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार असून त्याच दिवसापासून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असून २ जून रोजी छाननी प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ४ जून निश्चित करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी १८ जून २०२६ रोजी गुरुवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे.
या निवडणुकीत जिल्हा परिषद, सोलापूर महानगरपालिका तसेच १७ नगरपरिषद व नगरपंचायतींसह एकूण १९ स्थानिक स्वराज्य संस्था सहभागी होणार आहेत. एकूण ६१६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यामध्ये ५४४ सामान्य मतदार, ४९ नामनिर्देशित सदस्य तसेच २३ अध्यक्षीय मतदारांचा समावेश आहे.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील कलेक्टर चेंबर निश्चित करण्यात आले आहे. अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ अशी राहणार आहे. अर्ज शुल्क १०० रुपये असून खुल्या गटासाठी ठेव रक्कम १० हजार रुपये तर अनुसूचित जाती-जमातीसाठी ५ हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे.
मतदानासाठी जिल्ह्यात एकूण सहा मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली असून ती उपविभागीय अधिकारी स्तरावर उभारण्यात येणार आहेत. मतमोजणी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे होणार आहे. आज सायंकाळपर्यंत अंतिम मतदार यादी सर्व राजकीय पक्षांना उपलब्ध करून देण्यात येणार असून तहसील कार्यालय, गटविकास अधिकारी कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयातही ती प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून १८ मे ते २५ जून या कालावधीत आचारसंहिता लागू राहणार आहे. या काळात निधीवाटप, धोरणात्मक निर्णय, पोस्टर-बॅनर आणि प्रचार साहित्यावर निर्बंध असतील. तसेच प्रत्येक तालुक्यात FST, SST आणि VST अशी स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी हे निवडणूक निर्णय अधिकारी तर निवासी उपजिल्हाधिकारी हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार असल्याचे सांगितले.